जेएनएन, मुंबई. Maharashtra Budget 2025 Highlights: आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पायाभूत सुविधामध्ये अजित पवारांनी रस्त्यांच्या कामावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. राज्यात होत असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांना त्यांनी मोठ्या निधीची तरतूद केली आहे.

बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गासाठी…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे 99 टक्‍के काम पूर्ण झाले असून त्यासाठी 64 हजार 755 कोटी रुपये खर्च झाला आहे. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा  लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. या महामार्गालगत अ‍ॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरविण्यात येतील. याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल.

पवनार ते पात्रादेवी महामार्ग

वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी या 760 किलोमीटर लांबीच्या, 86 हजार 300 कोटी रुपये किंमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट, 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल.

    मुंबई उपनगर परिसरातील रस्त्यासाठी 64 हजार 783 कोटी रुपयांचा निधी

    मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गत‍िमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64 हजार 783 कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

    उन्नत मार्ग

    ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन असून त्याव्दारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जातील.

    सागरी महामार्गासाठी मोठी तरतूद

    बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर असून त्याचे सुमारे 3 हजार 364 कोटी रुपये खर्चाचे   काम सन 2028 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

    स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे 14 किलोमीटर लांबीचे, 18 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे काम मे, 2028 पर्यंत  पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

    उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

    तळेगाव ते चाकण मार्गासाठी  6 हजार 499 कोटीचा निधी

    पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या  25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च  अपेक्षित आहे.

    ग्रामसडक योजनेसाठी मोठा निधी

    प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -3 अंतर्गत 6 हजार 500 किलोमीटर लांबीची, 5  हजार 670 कोटी रुपये किंमतीची कामे मंजूर असून त्यापैकी 3 हजार 785 किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. सन 2025-26 साठी 1500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-1 ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा-2 अंतर्गत 9 हजार 610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामे मार्च, 2026 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना  टप्पा-2 अंतर्गत अतिरिक्त  7 हजार किलोमीटर लांबीच्या  रस्त्यांचे  काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. 

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3 अंतर्गत 1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 3 हजार 582 गावे, 14 हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील. या प्रकल्पाची एकूण किंमत 30 हजार 100 कोटी रूपये आहे. पहिल्या टप्प्यात 8 हजार कोटी रूपये रकमेची कामे हाती घेण्यात येणार आहेत.