मुंबई (एजन्सी)- Mumbai Rain : ढगफुटीसारख्या परिस्थितीमुळे आलेल्या पुरामुळे नांदेड जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मुंबईत सुमारे ३०० मिमी इतका विक्रमी पाऊस पडला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. राज्याच्या विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे 12 ते 14 लाख एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असे फडणवीस यांनी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
12-14 लाख एकर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानाव्यतिरिक्त, नांदेड जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि गुरांचेही नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईत जवळपास 300 मिमी इतका विक्रमी पाऊस पडला आहे. शहराची जीवनरेखा असलेल्या उपनगरीय गाड्यांचा वेग कमी झाला आहे किंवा त्या उशिराने धावत आहेत. मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली असून 400 ते 500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान शिंदे सलग दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले.
हे ही वाचा -Maharashtra Rains: राज्यात 6 जणांचा मृत्यू, समुद्रात जाऊ नका, हवामान विभागाने जाहीर केला अलर्ट
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सतर्क -
फडणवीस म्हणाले की, प्रशासनाने शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे आणि खाजगी कार्यालयांना शक्य असेल तेथे घरून काम करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. संध्याकाळी भरती येण्याची शक्यता आहे आणि आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सतर्क आहेत, असे फडणवीस म्हणाले.
धरणांमधून विसर्ग व्यवस्थापनासाठी शेजारील राज्यांशी समन्वय साधला जात असल्याचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. अनियंत्रित पाणलोट क्षेत्रे ही चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले. एनडीआरएफच्या नियमांनुसार, गुरेढोरे, घरांचे नुकसान आणि जीवितहानी झाल्यास बाधित व्यक्तींना आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे (स्थळ तपासणी) करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील ५ ते ७ गावे पाण्याखाली -
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लेंडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मुखेड तालुक्यातील पाच ते सात गावं पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत आठ जणांचा बळी गेला असून, अनेक घरे आणि शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुखेड तालुक्यातील रावणगाव, हसनाळ, भासवाडी, वडगाव भेंडगाव या गावांत पुराचे पाणी शिरल्याने घरे पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 300 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
हे ही वाचा -Mumbai Rains: मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ; परिसरात NDRF पथके, बोटी तैनात, एकनाथ शिंदेंनी केली पाहणी
८ जणांचा बळी, अनेक बेपत्ता!
मुसळधार पावसामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतजमिनीतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आमदार तुषार राठोड यांच्यावर नागरिकांचा रोष!
पूरस्थिती बिकट होत असताना मदतीसाठी लोक आक्रोश करत होते. मात्र, मुखेडचे आमदार तुषार राठोड तब्बल 24 तासानंतर गावात दाखल झाले. त्यामुळे नागरिकांनी संतप्त होऊन रोष व्यक्त केला. पुराने नुकसान होत असताना आमदार 24 तास कुठं होते? एवढ्या मोठ्या संकटात लोकांनी मदतीची वाट पाहायची का? असा सवाल नागरिक करत आहेत.