जेएनएन, मुंबई: पुढील 24 तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
समुद्रात न जाण्याच्या सूचना
INCOIS तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून समुद्राची स्थिती खवळलेली आहे. ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या नद्यांनी ओलांडली इशारा पातळी
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील गड नदी, वाघोटण या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
नांदेडमध्ये 293 नागरिकांना सुखरूप सुटका
SDRF चे 1 पथक नांदेड तालुका मुखेड येथे कार्यरत असून आतापर्यंत 293 नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे.
राज्यात पावसाच्या घटनेत मृत्यू आणि जखमी:
- बीड: 1 जणांचा मृत्यू (पुरात वाहून).
- मुंबई शहर: 1 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी (भिंत पडून).
- चंद्रपूर: एका जनावराचा मृत्यू
- नांदेड: 4 जणांचा मृत्यू + 5 जण बेपत्ता (पुरात वाहून).
लोकल सेवा स्थगित
मुसळधार पावसामुळे एका भागात ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कुर्ला स्थानकांदरम्यानच्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.