जेएनएन, मुंबई. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. “मोदी ईव्हीएमच्या जोरावर माज करत आहेत. निवडणूक आयोगातही सत्ताधाऱ्यांचीच माणसं बसवलेली आहेत,” असा गंभीर आरोप ठाकरेंनी केली आहे. तसंच, त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचं आवाहन केलं. मुंबई ताब्यात घेण्याचं सत्ताधाऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करा, असं थेट आव्हानही राज ठाकरे यांनी केला.
मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मुंबई ही केवळ शहर नाही, तर मराठी माणसाचं अस्तित्व आहे. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कुणाला किती जागा मिळाल्या, यावरून नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हितापुढे बाकी सर्व मुद्दे क्षुल्लक आहेत.”
राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, सत्तेविना राहिलो तरी आमचा दबदबा कायम आहे. “आम्ही सत्तेत नसलो तरी रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवणारा पक्ष आहोत. सत्ताधाऱ्यांना गाडायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असे आव्हान केले.
ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी सांगितलं की, “निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे का, हा प्रश्न जनतेला पडला आहे. प्रचार सभांमध्ये यावर मी सविस्तर भूमिका मांडणार आहे.”
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उत्साह टिकवण्याचं आवाहन केलं. “आज-उद्या उमेदवारी अर्ज भरण्यात येतील. जल्लोष करा, पण शिस्त ठेवा. ही लढाई केवळ निवडणुकीची नाही, तर मुंबईच्या भवितव्याची आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या या आक्रमक वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीत मनसेची भूमिका अधिक आक्रमक राहणार, हे स्पष्ट संकेत या मेळाव्यातून मिळाले आहेत.
