जेएनएन, पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv sena UBT) आणि काँग्रेस यांच्यात पुण्यात अधिकृत युती झाली असून, दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची औपचारिक घोषणा केली आहे. या युतीअंतर्गत शिवसेना ठाकरे गट 45 जागांवर, तर काँग्रेस 60 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले.

एकत्रितपणे जनतेसमोर जाण्याचा निर्णय

संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं की, पुण्यात भाजप व महायुतीच्या धोरणांना प्रभावी पर्याय देण्यासाठी आणि शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर एकत्र लढण्यासाठी ही युती करण्यात आली आहे. महापालिकेतील सध्याची परिस्थिती, नागरिकांचे प्रश्न, वाढती महागाई, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अनियोजित विकास या मुद्द्यांवर एकत्रितपणे जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये सहमती 

युतीतील जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्याचं स्पष्ट करताना, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं नेत्यांनी सांगितलं. उमेदवार निवडीमध्ये स्थानिक ताकद, सामाजिक समीकरणे आणि जिंकण्याची क्षमता या निकषांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. 

    मनसेसोबतची युती झाल्यास

    दरम्यान, या युतीपुरतीच मर्यादा न ठेवता मनसेसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर मनसेसोबत सकारात्मक चर्चा झाली, तर पुण्यात एक व्यापक विरोधी आघाडी उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेसोबतची युती झाल्यास मतविभाजन टळून भाजपविरोधात थेट लढत होईल, असा विश्वासही नेत्यांनी व्यक्त केला. 

    या घडामोडीमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली असून, महापालिका निवडणूक आता दोन किंवा तीन प्रमुख आघाड्यांमध्ये रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना UBT–काँग्रेस युती आणि संभाव्य मनसे सहभागामुळे भाजपसमोर कडवी लढत उभी राहणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.