जेएनएन, उल्हासनगर: उल्हासनगर महानगर पालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती अस्तित्वात असली, तरी उल्हासनगरमध्ये मात्र ही महायुती अखेर तुटली आहे. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते महायुती कायम ठेवण्यासाठी आग्रही होते, मात्र स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकले नाही.
उल्हासनगरमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार
भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वाधारीया यांनी याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितलं की, “उल्हासनगरमध्ये आता महायुती होणार नाही. भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असून, महापालिकेच्या सर्व 78 जागांवर भाजपच्या उमेदवारांना अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” त्यामुळे भाजपने थेट ताकद आजमावण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
उल्हासनगर मध्ये ‘दोस्ती गठबंधन’
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) यांनीही स्वतंत्र वाटचाल न करता साई पक्ष आणि टीम ओमी कलानी यांच्यासोबत एकत्र येत नवी राजकीय आघाडी उभारली आहे. या तीन पक्षांनी मिळून ‘दोस्ती गठबंधन’ उभारण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक राजकारणात प्रभाव असलेल्या ओमी कलानी गटासोबतची ही युती शिवसेनेसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
महायुती तुटल्यामुळे उल्हासनगर महापालिकेची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. भाजप स्वबळावर सर्व जागा लढवत असताना, दुसरीकडे ‘दोस्ती गठबंधन’ आपली ताकद पणाला लावणार आहे. याशिवाय अन्य पक्ष आणि स्थानिक आघाड्याही मैदानात उतरल्यास मतविभाजन होण्याची दाट शक्यता असून, त्याचा थेट परिणाम सत्तास्थापनेवर होऊ शकतो.
