जेएनएन, अहिल्यानगर. Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात मंगळवारी मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक गांवाना पुराचा तडाखा बरला आहे. अनेक रस्ते, पुल हे पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक नद्यांना पूर आले असून नद्या ओसंडून वाहत आहेत.
अनेक गावांना पाण्याचा वेढा
सलग पाच तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पूर्णा आणि वालुंबा नद्यांना पूर आला. या पुराने खडकी गावाला पाण्याचा वेढा पडला, भोरवाडीचा संपर्क पूर्णपणे तुटला, तर वाळकीच्या बाजारपेठेतही पाणी घुसले. नगर-दौंड महामार्ग गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच वाहतुकीसाठी बंद झाला.
अनेक घरांमध्ये पाणी शिरले
तर अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. पुरामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले, शेतीचे नुकसान झाले, आणि काही ठिकाणी पाळीव जनावरेही वाहून गेली. खडकी गावाला पूर्णा आणि वालुंबा नद्यांच्या पुराने वेढा दिल्याने गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे गावकऱ्यांची धावपळ उडाली. गावातील काही पाळीव जनावरेही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
हेही वाचा - Monsoon 2025: राज्यात 30 मे नंतर पाऊस मारणार मोठी दांडी, हवामान तज्ञानं सांगितलं कारण, अरबी समुद्रात…
15 नाले आणि बंधारे पुराच्या पाण्याने फुटले
भोरवाडी गावातही पावसाने हाहाकार माजवला. गावाजवळील पासपरा तलाव पूर्णपणे भरल्याने तो फुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. गावातील जवळपास 15 नाले आणि बंधारे पुराच्या पाण्याने फुटले, आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरले.
नगर-दौंड महामार्ग वाहतुकीसाठी बंद
या पुरामुळे नगर-दौंड महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याची नोंद आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.