जेएनएन, मुंबई. Monsoon 2025 Latest News: राज्यात सध्या मान्सून पूर्व पावसानं सर्वत्र दुमाकूळ घातला आहे. तर मुंबई पुण्यासह काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे. राज्यात सुरु असलेल्या दमदार पावसानंतर शेती मशागतीच्या कामांना गती आली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी पिक लागवडची घाई करु नये असं आवाहन हे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. यातच आता हवामान तज्ञांनं शेतकऱ्यांची चिंता वाढणारी बाब सांगितली आहे.
आत्ताच पेरणीची घाई करु नये
छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. आत्ताच पेरणीची घाई करु नये, असे जिल्हाधिकारी आवाहन दिलीप स्वामी यांनी शेतकऱ्यांना केले आहे. सध्या आपल्याला जास्त पाऊस दिसत असला तरी येत्या काळात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं आणि ते कोणालाही परोडणारे नाही. आम्ही हवामान तज्ञांनाही या विषयी विचारणा केली आहे, त्यांनीही सध्या पेरणी न करण्याचं आवाहन केलं आहे, असं म्हणतं स्वामी यांनी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केलं.
30 मे पासून कमी होण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्रात (पुण्यातही) व मराठवाड्यात पावसात कपात उद्यापासून संभवते. या भागांमध्ये फक्त तुरळक व हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे घाटांमध्ये फक्त यलो अलर्ट लागू होण्याची शक्यता आहे. 30 मे पासून पुढील 6-7 दिवस राज्यात पावसात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे, कारण अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिम वाऱ्यांची ताकद कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्द्रतेचा प्रवेशही कमी होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख हवामान अंदाज आणि पीक सल्लागार अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट
- ऑरेंज अलर्ट - रायगड, रत्नागिरी, सिंद्धुदुर्ग, सातारा घाट, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर,
- येलो अलर्ट - यवतमाळ, वाशिम, वर्धा, गडचिरोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर घाट, पुणे, जळगाव, नंदुरबार, धुळे, मुंबई आणि ठाणे,