जेएनएन, मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठी, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. 

'सचेत' प्रणालीवरून 19 कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश देण्यात येत आहेत. त्यावरून 19 कोटी 22 लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले आहे. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे. 

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती  सेठी यांनी दिली आहे.