जेएनएन, मुंबई. (Prajakta Mali on Suresh Dhas): भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीसंदर्भात (Prajakta Mali) केलेल्या वक्तव्यावर जाहीर दिलगिरी केली आहे. यानंतर आता याप्रकरणावर प्राजक्ता माळीनं एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका व्यक्त केली आहे.
प्राजक्तानं व्यक्त केली भूमिका
आमदार सुरेश धस यांनी माझ्यासह सर्व महिला वर्गाची माफी मागितली आहे. त्यामुळे मला आता या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही, अशी भूमिका प्राजक्ता माळीनं घेतली आहे. तसंच, या प्रकरणावर आपण पडदा टाकला आहे, असं ती म्हणाली.
मानले सर्वांचे आभार
माझ्याबाबत झालेल्या वक्तव्यानंतर आम्ही खूप खचलो होतो, मात्र, अनेक स्तरातून फोन आले, त्यांनी माझे मनोबळ वाढवले, माझ्या पाठीशी उभे राहिले, ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते, असं प्राजक्ता माळी म्हणाली.
सुरेश धस यांनी व्यक्त केली होती दिलगिरी
प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताई सह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे सुरेश धस यांनी म्हटलं.
माफीसाठी दबाव टाकला नाही
दरम्यान, मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, किंवा कुणी माफीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले.