मुंबई. Maratha Quota Protest Mumbai : मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस अजून जरांगे पाटील यांनी आजपासून पाणीही त्याग करण्याचा इशारा दिल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान आंदोलकांकडून महिला पत्रकारांसोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनने रविवारी मनोज जरांगे यांना पत्र लिहून आंदोलकांना आवरा अन्यथा आंदोलनाचे वार्तांकन करणार नाही, असा इशारा दिला आहे.
शनिवारी आंदोलनाचे वार्तांकन करायला गेलेल्या एका महिला पत्रकारासोबत आंदोलकांनी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला होता. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे घडली आहे. त्याचबरोबर आंदोलकांनी एका व्हिडिओ जर्नलिस्टलाही धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकार संघटनेने जरांगे यांना पत्र लिहून सांगितले आहे की, माध्यम प्रतिनिधींना आणि विशेष करून महिला पत्रकारांना आंदोलकांकडून त्रास दिला जात आहे. त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलले जात आहे. महिला माध्यम प्रतिनिधींचे कपडे ओढणे, महिलेला खेटून उभे राहणे, असभ्य शेरेबाजी करणे आदी प्रकार केले जात आहेत. आपण स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणता मग महिला पत्रकारांचा अपमान कसा करता, असा सवाल असोसिएशनने केला आहे.
मराठा आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलक रेल्वे रुळावरू व फलाटांवर ठाण मांडून बसल्याने लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात गर्दी केली असून रात्रीच्या वेळी हजारोंच्या संख्येने आंदोलक सीएसएमटी स्थानकावरच झोपत आहेत. हा संवेदनशील विषय असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील संयमाची भूमिका घेतली आहे.
आंदोलनांना नियंत्रित करताना वाहतूक पोलीस व पोलिसांची तारांबळ उडत आहे. अनेक आंदोलकांच्या गाड्या नवी मुंबई परिसरात अडवण्यात आल्या असून सीएसएमटीकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे. नवी मुंबईतून अनेक आंदोलक रेल्वेने मुंबईत दाखल होत असल्याने लोकल गर्दीने फुल्ल भरून धावत आहेत.