जेएनएन, जालना. Maharashtra Weather Update: मराठवाड्यावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट कोसळले. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशीव आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. जालना जिल्ह्यात आज ढगफुटी (Cloudburst in Jalna) झाली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर आला असून तब्बल 32 गावे पुराच्या पाण्यात वेढली गेली आहेत.
10 मंडळांत अतिवृष्टी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात 10 मंडळांत अतिवृष्टी झाली. तब्बल 200 मिमी पावसाची नोंद झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
नाथसागरचे दरवाजे उघडले!
पावसामुळे नाथसागर धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले असून सुमारे सव्वा लाख क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैठण तालुक्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.
जनावरे वाहून गेली, पिकांचे मोठे नुकसान!
पूरामुळे 60 पेक्षा अधिक जनावरे वाहून गेली आहेत. अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापूस, सोयाबीन, ज्वारी यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले आहे.
जनजीवन विस्कळीत
पूरामुळे रस्ते बंद झाले.गावात पाणी भरले आहे. वाहतूक विस्कळीत झाली आणि विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपत्कालीन पथक सतत गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.