जेएनएन, बीड. Avinash Sable Wins Gold: आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या (Asian Athletics Championship 2025) स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी दिसून आली. यामध्ये बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील अविनाश साबळेने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. अविनाश साबळेच्या यशस्वी कामगिरीनंतर अविनाशच्या मांडवा गावात आनंदोत्सव पाहायला मिळाला. ग्रामस्थ तसेच प्राध्यापकांनी अविनाशच्या कुटुंबियांची भेट घेऊन पेढे भरविले.

आशियात वर्चस्व केलं सिद्ध

अविनाशच्या नावावर 3000 मीटर स्टीपलटेसमध्ये राष्ट्रीय विक्रमही आहे. तसेच तो आशियाई क्रीडा स्पर्धेतही यापूर्वीच सुवर्णपदक जिंकला आहे. आता त्याने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदकाची कमाई करत आशियात त्याचे वर्चस्व सिद्ध केले आहे.

बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेला अविनाश हा आशियाई चॅम्पियन ठरला आहे. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे.  अविनाशने अंतिम शर्यतीत 8:20:92 सेंकदाची वेळ नोंदवत जपानच्या युतारो निनोए आणि कतारच्या झकारिया एलाहलामी यांना नमवत प्रथम क्रमांक पटकवला आहे. जपानच्या युतारोला रौप्य पदक तर कतारच्या झकारियाला कांस्य पदक मिळाले आहे.  

अविनाश ठरला तिसरा

अविनाश साबळेने यापूर्वी 2019 मध्ये आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. तो या स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 1975 साली हरबैल सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 1989 मध्ये दिना राम यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं.

    या प्रकारातील भारताची पदके

    • 1975 - हरबैल सिंग - सुवर्णपदक
    • 1979- गोपाल सिंग सैनी कांस्यपदक
    • 1981 - गोपाल सिंग सैनी - रौप्यपदक
    • 1981- अनोख सिंग - कांस्यपदक
    • 1983 - अनोख सिंग - कांस्यपदक
    • 1985 - शणमुगिन पिचैया - कांस्यपदक
    • 1989 - दीना राम - सुवर्णपदक
    • 2019 - अविनाश साबळे कांस्यपदक
    • 2025 - अविनाश साबळे - सुवर्णपदक

    हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा या लाभार्थांकडून सरकार वसूल करणार पैसे?