मुंबई. BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेने (Shivsena UBT) उमेदवारी प्रक्रियेत अतिशय काटेकोर आणि नियोजनबद्ध रणनीती आखल्याचं स्पष्ट होत आहे. पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी आणि उमेदवारांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी ठाकरे गटाने AB फॉर्म देण्यात जाणीवपूर्वक विलंब करण्याची रणनीती आखली असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे बहुतांश उमेदवार सोमवार आणि मंगळवारीच आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी, शनिवार आणि रविवारी मातोश्रीवर उमेदवारांना अधिकृत AB फॉर्म दिले जाणार आहेत. मात्र हे फॉर्म शेवटच्या क्षणी देण्यामागे पक्षाचं ठोस राजकीय गणित आहे.
बंडखोरीला आळा घालण्यासाठी शेवटच्या क्षणाची खेळी-
मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक जागांवर इच्छुकांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी न मिळाल्यास नाराज कार्यकर्ते बंडखोरी करू शकतात, हा धोका लक्षात घेऊनच ठाकरे गटाने ही रणनीती स्वीकारल्याचं बोललं जात आहे.
उमेदवारांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे, उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांना अपक्ष किंवा इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी वेळच मिळणार नाही, असा पक्षाचा अंदाज आहे.
AB फॉर्म म्हणजे पक्षाची अंतिम मोहोर-
निवडणूक प्रक्रियेत AB फॉर्मला अत्यंत महत्त्व असतं. अधिकृत पक्षाचा उमेदवार असल्याचा तो पुरावा असल्याने, हा फॉर्म मिळाल्याशिवाय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकत नाही. त्यामुळे AB फॉर्म देण्यात उशीर करत ठाकरे गटाने उमेदवारांवर पूर्णपणे पकड ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र आहे.
मातोश्रीवर हालचालींना वेग-
शनिवार-रविवारी मातोश्रीवर उमेदवारांची वर्दळ वाढण्याची शक्यता असून, उमेदवारीबाबत अखेरचा निर्णय ठाकरे कुटुंब आणि वरिष्ठ नेते घेणार असल्याचं समजतं. अनेक प्रभागांमध्ये बदल, समीकरणं आणि स्थानिक राजकारणाचा आढावा घेऊनच AB फॉर्म दिले जाणार आहेत.
