जेएनएन, ठाणे. Thane municipal election 2026 : एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यातच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील ( eknath shinde) अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली असून, या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
मीनाक्षी शिंदे या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख पदावर कार्यरत होत्या. पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपाखाली एका शाखाप्रमुखाला निलंबित केल्यानंतर शिंदे गटातील असंतोष अधिक तीव्र झाला. या कारवाईनंतर मीनाक्षी शिंदे यांनी आपली भूमिका बदलत थेट राजीनामा देत नाराजी व्यक्त केली.
उमेदवारीवरून वाद, अंतर्गत संघर्ष उफाळला!
ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ३ मध्ये ठाकरे गटाशी संलग्न उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच प्रभागात शिंदे गटातील विक्रांत वायचळ यांना उमेदवारी देण्याचा आग्रह स्थानिक कार्यकर्त्यांकडून धरला जात होता. विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
पक्षाने मात्र वायचळ यांची उमेदवारी डावलत वेगळा निर्णय घेतल्याने नाराजी उफाळून आली. उमेदवारी नाकारल्यानंतर विक्रांत वायचळ यांची हकालपट्टी करण्यात आली. या निर्णयामुळे मीनाक्षी शिंदे अधिकच संतप्त झाल्या आणि त्यांनी थेट राजीनामा देत पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली.
नरेश म्हस्केंविरोधात असंतोष-
या संपूर्ण प्रकरणात खासदार नरेश म्हस्के यांच्या भूमिकेबाबत पक्षांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठाण्यातील अनेक जुने शिवसैनिक म्हस्के यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. उमेदवारी ठरवताना स्थानिक कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, ठाण्यातील शिंदे गटातील वाढत्या असंतोष असल्याचे समोर आले आहे.
महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटासमोर आव्हान-
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उफाळून आल्याने शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे याच शहरात पक्षांतर्गत बंडाचे सूर उमटणे हे नेतृत्वासाठी चिंतेचे मानले जात आहे.
