चंद्रपूर- Chandrapur, municipal corporation election 2026 : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपुरात भाजपमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाला बाजूला सारल्यामुळे पक्षांतर्गत वाद चिघळल्याचे चित्र आहे. चंद्रपुरातील भाजप महापालिका निवडणूक तयारीत मुनगंटीवार गटाला डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये पसरली असून, याचा थेट परिणाम पक्षाच्या एकजुटीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपुरात भाजप महापालिका निवडणूक माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जावी, अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांची होती. मात्र, त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक मानल्या जाणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांची पुन्हा एकदा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने मुनगंटीवार समर्थकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. तसेच, चंद्रपूरचे माजी महापौर चयनसूख संचेती यांच्याकडे निवडणूक निरीक्षक पद कायम ठेवण्यात आल्याने नाराजी अधिकच वाढली आहे.
या नियुक्त्यांचे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढत आमदार किशोर जोरगेवार यांना नियुक्तीपत्र दिले आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे.
आधीच भाजपला बसलाय धक्का -
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये चंद्रपुरात भाजपला मोठा फटका बसला होता. जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांपैकी केवळ दोन ठिकाणीच भाजपला यश मिळाले होते. या अपयशानंतर पक्षातील जबाबदाऱ्या ठरवताना अधिक समन्वयाची अपेक्षित होती. मात्र, त्याऐवजी जुन्याच वादग्रस्त चेहऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्याने मुनगंटीवार गट अधिक नाराज झाला आहे.
निवडणुकीआधी एकजुटीचे आव्हान-
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर आता सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे.अंतर्गत नाराजी दूर करून संघटनात्मक एकजूट ठेवणे भाजपसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमधील भाजपचे प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या समर्थकांची मोठी ताकद लक्षात घेता, ही नाराजी कायम राहिल्यास भाजपच्या निवडणूक कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.
