मुंबई - Bmc Election 2026 : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन अर्जांचे वितरण सुरू झाले असून, पहिल्या दिवशी तब्बल 4,965 नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत उमेदवारांनी अद्याप वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या दिवशी अर्ज दाखल का झाले नाहीत?

निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल न होण्यामागे अनेक कारणे पुढे येत आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटप, युती-आघाड्यांबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून उमेदवार निश्चितीवर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी घाई न करता थोडी वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

अर्ज वितरणाचा तपशील-

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्जांचे वितरण झाले. एकूण 4,965 नामनिर्देशन अर्ज विविध प्रभागांमध्ये वितरित करण्यात आले.बहुतांश अर्ज हे प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि अपक्षांनी घेतल्याची माहिती आहे.

31 डिसेंबरपासून छाननी प्रक्रिया-

    निवडणूक कार्यक्रमानुसार 31 डिसेंबर रोजी नामनिर्देशन अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३ जानेवारी असून, त्यानंतरच अंतिम उमेदवारांची चित्र स्पष्ट होणार आहे.

    महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष!

    मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही ही निवडणूक प्रतिष्ठेची मानत असून, उमेदवार निवडताना मोठी चाचपणी केली जात आहे. पहिल्या दिवशी अर्ज दाखल झाले नसले तरी पुढील काही दिवसांत नामनिर्देशन प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. विशेषतः जागावाटपाचे चित्र स्पष्ट होताच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.