जेएनएन, मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची युती आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या बुधवारी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

युतीची घोषणा जाहीर करतानाच संजय राऊत यांनी दोन्ही ठाकरे बंधू केवळ मुंबई महापालिकाच नव्हे, तर राज्यातील एकूण सात महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं. यामुळे महापालिका राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

‘या’ 7 महापालिकांमध्ये एकत्र लढणार! 

संजय राऊत यांनी खालील महापालिकांचा समावेश असल्याचं सांगितले.

  1. मुंबई महानगरपालिका (BMC)
  2. ठाणे महानगरपालिका
  3. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
  4. नवी मुंबई महानगरपालिका
  5. पुणे महानगरपालिका
  6. नाशिक महानगरपालिका
  7. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम

राज आणि उद्धव ठाकरे यांची ही युती विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मराठी मतदारांवर प्रभाव असलेल्या या दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद महायुती आणि महाविकास आघाडीच्या इतर घटकांसाठी आव्हान ठरू शकते. 

    उद्याच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष

    उद्या होणाऱ्या अधिकृत घोषणेत युतीची रूपरेषा, जागावाटपाचं सूत्र आणि संयुक्त प्रचाराची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. राज–उद्धव ठाकरे यांची ही युती महापालिका निवडणुकांत नेमकं काय चित्र बदलणार आहे.