जेएनएन, मुंबई. Maharashtra 10th Result 2025: दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अभिनंदन केले आहे. तर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी ना उमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या
दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 58 हजार 020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 94.10 अशी आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय
नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,585 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील 8,844 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 92.27 अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही भुसे यांनी अभिनंदन केले आहे.
मुलींची आघाडी
सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 96.14 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.31 इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83 टक्क्यांनी जास्त आहे.
दहावीच्या एकूण 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 23 हजार 489 शाळांपैकी 7924 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी 4 लाख 88 हजार 745 विद्यार्थी प्रविण्यासह प्रथम श्रेणीत तर 4 लाख 97 हजार 277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे.
विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 98.82 टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 94.81, छत्रपती संभाजीनगर विभागात 92.82, मुंबई विभागात 95.84, कोल्हापूर विभागात 96.87, अमरावती विभागात 92.95, नाशिक विभागात 93.04 आणि लातूर विभागात 92.77 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.