जेएनएन, मुंबई. Mumbai Rains: राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि पुणे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील 24 तास मुसळधार पाऊस पडतच राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

शिवाय, राज्यात तब्बल 7 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आणि 15–16 जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे अशी माहिती  हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक पिके पाण्याखाली वाहून गेली आहे. शेतीतील पिकाच्या नुकसानमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

रेड अलर्ट!

दक्षिण कोकण आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .शिवाय कोकण किनारपट्टीसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस आणि वारा यासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मराठवाडा, विदर्भाला अलर्ट!

मराठवाडामध्ये मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात रेड आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण विदर्भ चंद्रपूर, गडचिरोली,यवतमाळ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे .

    मुंबईसाठी पुढील 24 तास हवामान!

    मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे. हवेचा वेगही वाढणार आहे.हवा अंदाजे 45–55 किमी,तास तर, काही ठिकाणी 65 किमी,तास वेगाने हवा वाहणार आहे.

    मुंबईत सुट्टी जाहीर

    भारतीय हवामान खात्याने आज 19 ऑगस्ट 2025 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.