जेएनएन, मुंबई. Mumbai Rains Update: राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कोकणात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. भारतीय हवामान खात्याने आज 19 ऑगस्ट 2025 रोजी कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सहसंचालक, उच्च शिक्षण कोकण विभाग यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

या जिल्ह्यांत सुट्टी जाहीर

सहसंचालक, उच्च शिक्षण कोकण विभाग, पनवेलच्या अधिनस्त येणाऱ्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांना मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशाने तसे कळविण्यात आले आहे.

मुंबईत शाळांसह कार्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. तसेच बीएमसीच्या वतीने आज सर्व शासकीय आणि खाजगी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.