मुंबई (एजन्सी) GSB Seva Mandal Insurance: मुंबईतील  सर्वात श्रीमंत गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जीएसबी सेवा मंडळाने यावर्षी पाच दिवसांच्या गणपती उत्सवासाठी  तब्बल 474.46 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. गेल्या वर्षी, मंडळाकडे 400.58 कोटींचे विमा कव्हर होते.

सायनमधील किंग्ज सर्कल येथे आयोजित हा उत्सव 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीपासून सुरू होईल आणि पाच  दिवस चालेल. मंडळाची गणेश मूर्ती 69 किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने, 336 किलोपेक्षा जास्त चांदी आणि भक्तांनी दान केलेल्या इतर मौल्यवान वस्तूंनी सजवलेली आहे, असे जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

देशातील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ असल्याचा दावा करणारे मंडळ यावेळी गणेशोत्सवाचे 71 वे वर्ष साजरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण कव्हरपैकी 67.03 कोटी रुपये सोने, चांदी आणि इतर दागिन्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

स्वयंसेवक, पुजारी व सुरक्षा रक्षकांनाही विमा कवच -

स्वयंसेवक, स्वयंपाकी, पुजारी, पादत्राणे स्टॉल कामगार, सेवक आणि सुरक्षा रक्षकांसाठी वैयक्तिक अपघात विम्यासाठी 375 कोटी रुपये आहेत, तर 30 कोटी रुपये सार्वजनिक जबाबदारीसाठी आहेत, ज्यामध्ये मंडप, स्टेडियम आणि भाविकांचा समावेश आहे, असे त्यात म्हटले आहे.

या विमा पॉलिसीमध्ये कार्यक्रमस्थळी फर्निचर, फिक्स्चर, डिजिटल मालमत्ता आणि इतर साहित्यासाठी एक मानक आग आणि विशेष धोक्याचे संरक्षण देखील समाविष्ट आहे.दरवर्षी, जीएसबी सेवा मंडळ समाजातील दुर्बल  घटकांपर्यंत पोहोचते आणि अशा लोकांना शिक्षणासाठी मदत पुरवते. ज्यामुळे वैयक्तिक विकास आणि सामाजिक प्रगतीला चालना मिळते, पै पुढे म्हणाले.