मुंबई | सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate)  यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा अशी साधारण जनतेची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषिमंत्री मिळालाय त्याची शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. सभागृहात बसून जंगली रमी सारखा जुगार खेळून त्यांनी सिद्ध केलं आहे की कृषीमंत्री कसा नसावा. त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी वंचितने (Vanchit Bahujan Aghadi) केली आहे. 

महाराष्ट्राच्या विधानभवनात बसून ऑनलाईन जुगार खेळून या कृषिमंत्र्यांनी केलेली जुगार क्रांती आहे.  शेती, शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नाशी जराही बांधील की नसणाऱ्या या कृषिमंत्र्याचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी ज्याला शेती संदर्भात खऱ्या अर्थाने जाण असेल आणि त्यांची शेतकऱ्यांच्या संदर्भात बांधिलकी असेल अशा व्यक्तीलाच ते खाते देण्यात यावे, अशी मागणी वंचितने केली आहे.