मुंबई. Aura farming dance Viral Video : सध्या जगभरातील तरुणांमध्ये 'ऑरा फार्मिंग' डान्सची एक नवी क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक तरुण तरुणींसोबत पोलीसही ही डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. त्यातच आता एका महिलेने सोशल मीडिया रिल्स बनवण्यासाठी चालत्या कारच्या बोनेटवर बसून हा डान्स केला. या बद्दल  नवी मुंबई पोलिसांनी 24 वर्षीय पुरूषासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रफीक सुलदे असे या डान्स करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

ही घटना 20 जुलै रोजी खारघर परिसरातील एका वर्दळीच्या रस्त्यावर घडल्याचे सांगितले जात आहे. मर्सिडीज-बेंझ कारवर हा स्टंट करण्यात आल्याचा आरोप आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आरोपी अल्फेश आझम शेख आणि रफिक सुलदे यांच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्सही नसल्याचे समोर आले आहे.

एका तरुणीने समाज मीडियासाठी रिल्स बनवण्यासाठी धावत्या कारवर 'Aura Farming Dance' केला. या घटनेमुळे रस्त्यांवरील प्रवाशांचे लक्ष वेधले गेले. नागरिकांमधून या कृत्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर 'लाइक्स' आणि 'फॉलोअर्स' मिळवण्यासाठी तरुण-तरुणी जीव धोक्यात घालून असे स्टंट करत असल्याचे दिसत आहे. याची दखल घेत पोलिसांनी या तरुणीविरोधात तसेच कार चालक मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी चालत्या गाडीच्या बोनेटवर उभी राहून 'ऑरा फार्मिंग' करताना दिसत आहे. एका इंडोनेशियन मुलाने त्याच्या नाट्यमय पोझने इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर ऑरा फ्रेमिंग वाऱ्यासारखी पसरले आहे. अशा बेपर्वा कृत्यांमुळे केवळ संबंधितांचे जीवन धोक्यात येत नाही तर सामान्य जनतेमध्ये भीती आणि दहशतीची भावना निर्माण होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

शेख आणि सुलदे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलमांखाली बेदरकारपणे गाडी चालवणे, यंत्रसामग्रीबाबत निष्काळजीपणाने वागणे, इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे आणि सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    काय आहे ऑरा फार्मिंग? what is aura farming

    एका इंडोनेशियन मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर 'ऑरा फार्मिंग' नावाचा एक ट्रेंड सुरू झाला आहे. जगभरातील नेटीझन्स आणि प्रसिद्ध खेळाडू या मुलाच्या डान्स स्टेप कॉपी करत आहेत. ऑरा फार्मिंगचा अर्थ लोकांना ऊर्जा देणारा आणि वातावरण चैतन्यशील बनवणारा क्षण. रायन अर्कान  (Rayyan Arkan Dikha) या 11 वर्षीय मुलाचा बोटीवर डान्स करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्याच्या डान्स स्टेप जगभरातील अनेक खेळाडू आणि सेलेब्रिटी कॉपी करत आहेत. मात्र इंडोनेशियामध्ये हा डान्स केवळ मनोरंजनासाठी केला जात नसून बोट शर्यतीतील परंपरेचा भाग आहे. बोटीच्या पुढच्या भागावर तोगाक लुआन नावाचा एक खास नर्तक संघाला प्रोत्साहन देण्यासाठी डान्स करत असतो. मात्र ही परंपरा आणि डान्समुळे रायन एक आयकॉन बनला आहे.