नवी दिल्ली. काही दिवसांपूर्वी देशवासीयांनी देशाचा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. मात्र छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा गावात एका तरुणाला राष्ट्रीय ध्वज फडकावल्याने आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. नक्षलवाद्यांनी हत्या केली छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील एका गावात नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची हत्या केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या व्यक्तीने स्वातंत्र्यदिनानिमित्त नक्षलवादी स्मारकावर तिरंगा फडकवला होता आणि पोलिसांनाही मदत केली होती.
अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली आहे. छोटेबेतिया पोलिस स्टेशन हद्दीतील बिंगुंडा गावातील मनीष नुरेती असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सशस्त्र नक्षलवाद्यांच्या एका गटाने गावात पोहोचून नुरेतीसह इतर दोघांना ओलीस ठेवले.
नक्षलवाद्यांनी जाहीर सभेत ठार मारले -
नक्षलवाद्यांनी जन अदालत आयोजित केली होती जिथे नुरेती याला ठार मारले. यावेळी इतर दोघांना मारहाण करून सोडून देण्यात आले. माओवाद्यांनी एक पोस्टर लावले ज्यामध्ये नुरेती हा पोलिसांचा खबरी असल्याचा दावा करण्यात आला होता, जो खोटा आहे, असे अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.
यापूर्वीही अनेकांना मारण्यात आले आहे-
कांकेर जिल्हा पोलिस अधीक्षक आय.के. एलेसेलाने सांगितले की, नुरेतीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क होऊ शकत नाही. एलेसेला यांनी सांगितले की, नक्षलवादी अनेकदा बिंगुंडा गावात येतात. गेल्या दीड वर्षात, नक्षलवाद्यांनी चार ते पाच लोकांना पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयातून ठार मारले आहे. तथापि, मृतांपैकी कोणाचाही पोलिसांशी कोणताही संबंध नव्हता.
या घटनेला दुजोरा देताना बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले, एक छोटासा व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये मनीष नुरेती स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही गावकरी, ज्यात मुलांचा समावेश आहे, 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' असे म्हणत तिरंगा फडकवताना दिसत आहेत.