पणजी. Goa ZP Election Result 2025 : गोव्यातील दोन जिल्हा पंचायतींसाठी आज मतमोजणी होत आहे. 20 डिसेंबर रोजी एकूण 50 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणी आज, सोमवार (दि. 22 डिसेंबर) रोजी सकाळपासून सुरू आहे. राज्यातील 15 ठिकाणी ही मतमोजणी केंद्र असून सुरूवातीच्या कलानुसार राज्यात भाजपने सर्वाधिक 10 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला काँग्रेसही टप फाईट देताना दिसत आहे.

गोवा जिल्हा पंचायत निवडणूक निकालानुसार दुपारी एकपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. यात भाजप 10 जागांवर, मगो 01, गोवा फॉरवर्ड 01, काँग्रेस 03, आरजी 01 आणि अपक्ष 01 जागेवर विजयी झाले आहे.

गोव्यातील जिल्हा पंचायतीसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आल्याने निकाल जाहीर होण्यास विलंब लागू शकतो, मात्र दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यातील 25 जागांसाठी 111 उमेदवार, तर दक्षिण गोव्यातील 25 जागांसाठी 115 उमेदवार असे एकूण 50 जागांसाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने मगोशी युती केली असून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. त्याबरोबरच आम आदमी पक्ष आणि स्थानिक रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी) निवडणुकीच्या मैदानात असल्याने ही लढत चौरंगी झाली आहे.

विधानसभेची रंगीत तालीम -

दोन जिल्हा पंचायतींची ही निवडणूक एक वर्षाने म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जात आहे. यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले असून सर्वच राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व पणाला लावले आहे. या निवडणुकीतून मतदारांनी दिलेल्या कौलाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण पक्के होणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्य प्रमुख अॅड. अमित पालेकर यांचा विधामनसभा मतदारसंघ असलेल्या सांताक्रुझमध्ये पंचायत निवडणुकीचे सांताक्रुझ व चिंबल हे दोन मतदारसंघ येतात यात जर आपचे उमेदवार निवडून आले तर पालेकर यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची ही पहिली निवडणूक असल्याने दोन्ही जिल्हा पंचायतींवर असलेले भाजपचे बहुमत टिकवून ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल.

भाजपने गेल्या अनेक महिन्‍यांपासून या निवडणुकीची तयारी केली आहे. त्यांनी या निवडणुकीत 80 टक्‍के नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे.