पणजी. Goa zilla panchayat elections : गोव्यातील दोन जिल्हा पंचायतींच्या 50 मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. शनिवारी 20 डिसेंबर 2025रोजी मतदान असून 22 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज (गुरुवार) अखेरचा दिवस असल्यामुळे राजकीय पक्षांच्या देशपातळीवरूल नेत्यांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचारावर धुरळा उडवून दिला आहे. विशेष म्हणजे वर्षभरानंतर विधानसभेच्या निवडणुका असल्याने यंदा 'झेडपी' निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. भाजप व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपली सर्व शक्ती निवडणुकीत पणाला लावली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांनीही चांगलीच कंबर कसली आहे.
या निवडणुकीला आगामी विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट संबोधले जात आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भाजपसह काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, रिव्हॉल्यूशनरी गोवन्स (आरजीपी), तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पक्ष मैदनात उतरले आहेत. या निवडणुकीत भाजपने मगोसोबत आणि काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत युती केली आहे. या 50 जागांसाठी राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून एकूण 226 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सर्व नेत्यांकडून पायाला भिंगरी बांधून प्रचार -
या निवडणुकीत भाजपने आपले सर्वस्व झोकले आहे. त्यातच आपनेही जोर लावला आहे. आपने अरविंद केजरीवाल व आतिशी या दिल्लीच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना गोव्यात प्रचारासाठी आणले आहे. केजरीवालांनी गोव्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढले आहे. हप्ता वसुली सरकारमुळेच नाइट क्लब अग्निकांड घडल्याची टीका केजरीवालांनी केली आहे. दुसरीकडे भाजपचे सर्व आमदार, मंत्री प्रचारात गुंतले आहेत. भाजपकडून गोमंतकीयांची घरे कायदेशीर करण्याचे आश्वासन दिले जात आहे.
प्रशासनाकडून मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण -
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 4 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यापैकी उत्तर गोव्यात 1,652 तर दक्षिण गोव्यात 1811 पोलीस तैनात करण्यात आले आहत
उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्हा अधिकाऱ्यांनी आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार मतदान केंद्रांपासून 100 मीटर अंतरावर असलेले सर्व रेस्टॉरंट्स, बार, चहाची दुकाने, पान दुकाने, भोजनालये आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने, ज्यात ढाबे हातगाड्या मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.
22 डिसेंबर रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी केंद्रांवर असेच निर्बंध लागू असतील. दोन्ही जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित जिल्हा पंचायत मतदारसंघातील मतदान केंद्रांपासून 200 मीटर अंतरावर पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र जमण्यावर बंदी घातली आहे. निवडणूक अधिकारी, दंडाधिकारी, पोलिस कर्मचारी आणि निवडणूक कर्तव्यासाठी अधिकृत सरकारी कर्मचारी यासह कर्तव्यावर असलेले सरकारी कर्मचारी या निर्बंधांपासून मुक्त आहेत. तसेच, हे आदेश विवाह किंवा अंत्ययात्रा आणि धार्मिक मिरवणुका किंवा कार्यक्रमांना लागू होणार नाहीत.
या आदेशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास भारतीय न्याय संहिता, 2023 (BNS) च्या कलम 223 अंतर्गत तसेच लागू असलेल्या कायद्यांच्या इतर संबंधित तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
सर्व 50 मतदारसंघांची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने शनिवारी (दि. 20) होणाऱ्या जिल्हा पंचायतीच्या मतमोजणीसाठी राज्यात 15 केंद्रे जाहीर केली आहेत. सोमवारी (दि. 22) मतमोजणी होणार आहे.



मतदानासाठी २० रोजी भर पगारी सुट्टी
कामगार, व्यवसायिक आस्थापनात काम करणारे कर्मचारी, खासगी आस्थापनात काम करणाऱ्या कामगारांना शनिवारी भर पगारी सुट्टी प्रशासनाने जाहीर केली आहे.
