मुंबई - BMC Election 2026 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या दोन महत्त्वाच्या बैठक रात्री पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यामुळे मुंबई महापालिकेतील महायुतीच्या जागावाटपाबाबत निर्णायक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, आमदार आशिष शेलार, तर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. मुंबईतील राजकीय गणित आणि निवडणूक रणनितीवर सखोल चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील जागावाटपावर शिक्कामोर्तब?
महायुतीत मुंबईत कोणता पक्ष किती जागा लढवणार, कोणत्या विभागांमध्ये कोणत्या पक्षाला प्राधान्य दिलं जाणार, यावर या बैठकीत निर्णय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व असून, त्यामुळे जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली.
इतर महापालिकांवरही चर्चा?
मुंबईबरोबरच ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक यांसारख्या इतर महापालिकांबाबतही प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. महायुती एकत्रितपणे आणि समन्वयाने निवडणूक लढवणार का, याबाबतही बैठकीत रणनीती ठरवण्यात आल्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्जांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग!
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने महायुतीच्या हालचालींना अधिक वेग आला आहे. त्यामुळे लवकरच जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर स्थानिक नेत्यांनाही लवकरच दिशा-निर्देश दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बंडखोरी रोखण्यासाठी रणनीती!
महायुतीच्या या रात्रीच्या बैठकीनंतर मुंबई महापालिकेतील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.बंडखोरी रोखण्यासाठी महायुतीने विशेष रणनीती तयार केली आहे.
