मुंबई. Bmc Election 2026 : मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी ठाकरे कुटुंबातील दुरावा संपुष्टात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (मंगळवार) युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बंद दरवाजामागे बैठका सुरू असून, जागावाटप, प्रचाराची दिशा आणि संयुक्त रणनितीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पत्रकार परिषद होणार?
राज आणि उद्धव ठाकरे हे आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (उद्धव गट) नेते संजय राऊत यांनीही युतीबाबत सकारात्मक संकेत दिले असून, “योग्य वेळी मोठी घोषणा होईल,” असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे आजचा दिवस शिवसैनिकसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक मानला जात आहे.
युतीमागची राजकीय गरज?
महायुतीने अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चांगलं यश मिळवल्यानंतर विरोधकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक या महापालिकांमध्ये ताकद वाढवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची राजकीय गरज निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिकेचं समीकरण बदलणार?
राज–उद्धव ठाकरे यांची युती झाली, तर मुंबई महापालिकेचं संपूर्ण राजकीय गणित बदलू शकते. मराठी मतदारांवर पकड असलेल्या या दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकते. त्यामुळे ही युती केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता राज्यभरात यांचा परिणाम होऊ शकते.
