रायगड. Nagar Panchayat Election Results 2025: राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. महायुतीने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत केले आहे. महाविकास आघाडीला ५० चा आकडाही गाठताना मुश्किल होत आहे. या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. येथे मशाल चिन्हावर विजयी झालेला उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून हातात धनुष्यबाण घेणार असल्याचे समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतुल चौगुले हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत, मंत्री भरत गोगावले यांची याला दुजोरा दिला आहे.

राज्यातील 288 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 आणि 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वच नगर परिषदांचा निकाल स्पष्ट झाला असून भाजपने दमदार कमगिरी करत शतक झळकावले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अर्धशतक पार केले असून राष्ट्रवादीचेही 40 ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी पुन्हा अपयशी ठरली असून ठाकरे सेनेचे केवळ 8 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यातच एक विजयी उमदवार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे.

राष्ट्रवादीची सत्ता उलथवली -

श्रीवर्धन नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षापासून असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता यावेळी पालटली आहे. श्रीवर्धन नगरपालिकेत नगराध्यक्षपदी विजयी झालेले अतुल चौगुले भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे निकालानंतर लगेच शिंदेसेनेने उद्धवसेनेला धक्का दिला.

श्रीवर्धन नगरपालिकेत मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारून ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती दिली. मात्र जिंकल्यानंतर लगेचच चौगुले शिंदेसेनेत जाणार असल्याने सर्वांनी तोंडात बोटे घातली आहेत. श्रीवर्धन नगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय चौगुले यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र या निर्णयाने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

    दरम्यान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, अतुल चौगुले पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, माझे त्यांच्याशी बोलणे झाले असून ते असे कोणतेही पाऊल उचणार नाहीत. शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांच्या पक्षातंराच्या वावड्या उठवल्या जात असून त्यात तथ्य नाही.

    दुसरीकडे भरत गोगावले यांनी सांगितले की, अतुल चौगुले शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याबाबत वरिष्ठांशी बोलणे सुरू असून निर्णय झाला की, त्यांचा पक्ष प्रवेश होईल.

    दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला हरवले -

    रायगड जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांमध्येच संघर्ष असल्याचे दिसून आले. याठिकाणी भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सामना होता. श्रीवर्धन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अतुल चौगुले विजयी झाले मात्र तटकरे यांच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिंदे सेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पडद्याआडून मदत केल्याचे बोलले जात आहे. चौगुले यांनीही विजयानंतर सांगितले की, आमदार भरतशेठ गोगावले, स्थानिक नेते अनिल नवगणे तसेच सेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यामुळे माझा विजय झाला. हा विजय शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांचा आहे.