मुंबई. Maharashtra Nagar Palika Election Result 2025: राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल आज (रविवार 21 डिसेंबर) जाहीर होत आहेत. 2017 नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी झाली. त्यामुळे या निवडणूक निकालांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून या निकालात भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

विधानसभा निवडणुकीत मिळवलेलं घवघवीत यश महायुती कायम राखत असल्याचे चित्र आहे. तर महाविकास आघाडी या निवडणुकीतही कमबॅक करण्यात अयशस्वी ठरली आहे. महायुतीमध्ये भाजपने शंभरच्या वर जागा जिंकून नंबर वन पक्ष ठरला आहे.

नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षांसाठीही यंदा थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे शहरांचा कारभारी कोण होणार? याकडंही मतदारांचं लक्ष लागलं असून यातही भाजपने मुसंडी मारल्याचं दिसत आहे. 

राज्यभरातील अनेक नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये भाजप आणि महायुतीनं बाजी मारली आहे. 288 पैकी भाजपने सर्वाधिक 134 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर 51 जागांवर शिंदे गट, 32 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट, 28 जागांवर काँग्रेस, 8 जागांवर शरद पवार गट तर 7 जागांवर ठाकरे गट आघाडीवर आहे.

तर 6859 नगरसेवक जागांवर 2844 जागा भाजपने, 537 जागांवर शिंदे शिवसेना, 180 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी, 97 जागांवर काँग्रेस,111 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट, 139 जागांवर शिवसेना ठाकरे गट तर अन्य 92 ठिकाणी विजयी झाले आहेत.

    एकूणच राज्यातील चित्र पाहिल्यास महाविकास आघाडी बॅकफुटवर फेकली गेल्याचे चित्र आहे. विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतही महायुतीनं बाजी मारल्याचं दिसत आहे.