मुंबई. BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेकडून मुंबई पालिकेसाठी 100 जागांची ठाम मागणी करण्यात आली असताना, भाजपने या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. भाजपकडून शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी झालेल्या पहिल्या फेरीतील चर्चेत भाजपकडून शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसल्याने दोन्ही पक्षांमधील मतभेद अधिक तीव्र झाले. शिवसेनेने मुंबईतील आपली संघटनात्मक ताकद, विद्यमान नगरसेवक आणि स्थानिक प्रभाव लक्षात घेता किमान 100 जागांवर दावा कायम ठेवला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीनंतरही 25 ते 30 जागांचा तिढा कायम राहिला आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊनही अंतिम तोडगा न निघाल्याने युतीतील अंतर्गत अस्वस्थता उघड होत आहे.
हे ही वाचा -मुंबईत ठाकरे–पवार आघाडीची चर्चा फिस्कटली? दोन जागांवरून तिढा, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
भाजपचा दावा आहे की, मुंबईत पक्षाची ताकद, मागील निवडणुकांतील मतांचा टक्का आणि संघटनात्मक विस्तार पाहता शिवसेनेला 100 जागा देणे शक्य नाही. त्यामुळेच भाजपने आता 70 जागांचा समन्वयाचा प्रस्ताव पुढे ठेवत चर्चेची दारे उघडी ठेवली आहेत.
या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होतो का, की तिढा आणखी वाढतो, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
