मुंबई l विधानसभा सदस्य शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या 223-राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 नुसार या मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येणार आहे.

यानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण 29 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 3 जानेवारी 2026 रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 3 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान ठेवण्यात आला आहे.

प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा 7 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुख्य  निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.