जेएनएन, पुणे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताब्या हा बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती आनंद कस्पटे यांच्या कड सोपवला आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार, स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे, असं तटकरे यांनी सांगितलं.
यापुढे वैष्णवी हगवणे यांचा मुलगा जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती कस्पटे यांची असेल, असं तटकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
16 मे रोजी वैष्णवीनं केली होती आत्महत्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहिष्कृत नेते राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांवर त्यांच्या सून वैष्णवीच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. 26 वर्षीय वैष्णवी हिने 16 मे रोजी पुण्याजवळील बावधन परिसरात तिच्या सासरच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
वैष्णवीच्या घरच्यांचा आरोप
वैष्णवीच्या सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप तिच्या कुटूंबियांनी केलेला आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.