जेएनएन, सोलापूर: Solapur News: सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांसाठी तीन दिवसांची मुलाखत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी ही माहिती दिली. आजपासून भाजप कार्यालयात ही मुलाखत प्रक्रिया सुरू होणार असून, पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे.
1200 हून अधिक इच्छुक
सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. सुमारे 1200 हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज सादर केल्याने पक्ष नेतृत्वासमोर योग्य उमेदवारांची निवड हे मोठे आव्हान ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर तीन दिवसांची सविस्तर मुलाखत प्रक्रिया आखण्यात आली आहे.
भाजप सोलापूर शहर कमिटीचे कडक आदेश
भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी एकट्याने उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आले आहेत. कोणतेही शक्तीप्रदर्शन, समर्थकांची गर्दी किंवा गोंधळ टाळण्यासाठी भाजप शहर कमिटीने कडक आदेश दिले आहेत. मुलाखतीदरम्यान शिस्त पाळावी आणि पक्षाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अशा उमेदवारावर भर
या मुलाखत प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची सामाजिक कामगिरी, पक्षाशी निष्ठा, स्थानिक जनाधार, संघटन कौशल्य आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता या निकषांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पक्षाच्या दृष्टीने सक्षम, स्वच्छ प्रतिमा असलेले आणि जनतेशी थेट संपर्क असलेले उमेदवार निवडण्यावर भर दिला जाणार आहे.
पालकमंत्री स्वतः उपस्थित राहणार
दरम्यान, या मुलाखतींसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह शहरातील तीन आमदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे मुलाखत प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, अंतिम उमेदवार निवडीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपाची तीन दिवसांची मुलाखत प्रक्रिया
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असून, इच्छुक उमेदवारांची ही तीन दिवसांची मुलाखत प्रक्रिया पक्षाच्या रणनीतीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. योग्य उमेदवारांची निवड करून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाच्या तारखा
- नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
- नामनिर्देशनपत्रांची छाननी - 31 डिसेंबर 2025
- उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- 02 जानेवारी 2026
- निवडणूक चिन्ह वाटप- 03 जानेवारी 2026
- अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
- मतदानाचा दिनांक- 15 जानेवारी 2026
- मतमोजणीचा दिनांक- 16 जानेवारी 2026
