जेएनएन, मुंबई. Maharashtra Municipal Corporation Election Date: बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
येथील सह्याद्री अतिथिगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.

महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 2025 रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.
हेही वाचा - BMC Election 2026 Date: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर, मतदान आणि निकाल कधी? वाचा सविस्तर कार्यक्रम
मतदार व मतदान केंद्र
- पुरुष मतदार- 1,81,93,666
- महिला मतदार- 1,66,79,755
- इतर मतदार- 4,596
- एकूण मतदार- 3,48,78,017
- एकूण मतदान केंद्र- 39,147
जागा व आरक्षित जागा
- महानगरपालिकांची संख्या- 29
- एकूण प्रभाग-893
- एकूण जागा- 2,869
- महिलांसाठी जागा- 1,442
- अनुसूचित जातींसाठी जागा- 341
- अनुसूचित जमातींसाठी जागा- 77
- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 759
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
- बृहन्मुंबई आणि ‘अ’ वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- रु. 15,00,000/-
- ‘ब’ वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) - रु. 13,00,000/-
- ‘क’ वर्ग महानगरपालिका (कल्याण-डोंबिवली, नवी मुबई, छ. संभाजीनगर व वसई-विरार)- रु. 11,00,000/-
- ‘ड’ वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व 19)- रु. 09,00,000/-
महत्वाच्या तारखा
- नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
- नामनिर्देशनपत्रांची छाननी - 31 डिसेंबर 2025
- उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- 02 जानेवारी 2026
- निवडणूक चिन्ह वाटप- 03 जानेवारी 2026
- अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
- मतदानाचा दिनांक- 15 जानेवारी 2026
- मतमोजणीचा दिनांक- 16 जानेवारी 2026
हेही वाचा - BMC Election 2026: मुंबई - पुण्यासह सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, आचारसंहिता लागू
