जेएनएन, सातारा. Satara Crime: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं असून महिलेने आत्महत्या करण्याआधी हातावर सुसाईट नोट लिहून दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. दोन पोलीस अधिकारी लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आले आहेत. या प्रकाराने सातारा जिल्हा तसेच राज्याच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

फलटण येथील एका महिला डॉक्टरने गुरुवारी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी महिलेने आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्ये लिहिल्याचे समोर आले आहे. यात म्हटले आहे की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने ४ महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.” या धक्कादायक प्रकाराने पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागात हादरला आहे. 

विशेष म्हणजे मृत महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाबद्दल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती.“माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन.” असा इशारा देऊनही वरिष्ठांकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचा मृतकाच्या सहकार्यांनी आरोप केला आहे. अखेर महिलेने टोकाचे पाऊल उचलत फलटणमधील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री आपले आयुष्य संपवले. 

मात्र महिलेच्या हातावर आढळलेल्या लिखाणामुळे सुरुवातीला आत्महत्या वाटणारे प्रकरण आता गुन्हेगारीच्या टप्प्यावर गेले आहे. आता संबंधितांवर काय कारवाई होणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया -

या प्रकरणार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, या घटनेचे अधिकृत कारण अधिकाऱ्यांकडून कळलेले नाही. मी पोलीस अधिक्षकांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारची सुसाईड नोट आढळली असेल तर ते अत्यंत खेदजनक आहे. या प्रकरणात तपास करून सर्व पुरावे गोळे केले जातील. महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचा अजून कोणावर संशय असेल तर त्यांची देखील माहिती घेतली जाईल. या घटनेत जो कोणी दोषी असेल तरी त्याला सोडले जाणार नाही. कठोर कारवाई करू.

    दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे -सुप्रिया सुळे

    फलटण, जि. सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या  प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते.  परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. या विषयाच्या मूळाशी नेमके कोणते कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्ट द्वारे दिली आहे.