एजन्सी, पुणे. Vaishnavi Hagawane Suicide Case Pune: वैष्णवी हगवणेच्या कुटुंबातील सदस्य तिच्या 10 महिन्यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी घरी गेल्यानंतर त्यांना धमकावल्याबद्दल एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहिष्कृत नेते राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांवर त्यांच्या सून वैष्णवीच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. 26 वर्षीय वैष्णवी हिने 16 मे रोजी पुण्याजवळील बावधन परिसरात तिच्या सासरच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
वैष्णवीच्या घरच्यांचा आरोप
तिच्या नातेवाईकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप केलेला आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
पिस्तूल दाखवून धमकावले
"19 मे रोजी विष्णवीचे कुटुंब, कस्पते कुटुंब, तिच्या 10 महिन्यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी नीलेश रामचंद्र चव्हाण यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी त्यांना धमकावले. हगवणे यांचे नातेवाईक चव्हाण यांनी त्यांना पिस्तूल दाखवून धमकावले. गुरुवारी, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, मुलाचा ताबा वैष्णवीच्या पालकांकडे सोपवण्यात आला," असे ते म्हणाले.
भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत चव्हाण यांच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.