जेएनएन, पुणे. Vaishnavi Hagvane Suicide Case Pune: पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणात वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताबा आज वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात येईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
तसंच, हगवणे कुटुंबातील 3 आरोपी अटक आणि 2 फरार असताना वैष्णवी यांचे 10 महिन्यांचे बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे होते. आज कायदेशीर मार्गाने जात सर्व प्रक्रिया पूर्ण करून या बाळाचा ताबा वैष्णवी यांच्या आई वडिलांकडे येणार असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली.
वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
तिचा नवरा शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांनी आर्थिक कारणांमुळे तिला मारहाण केली होती, असं वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. एकदा तिच्या वडिलांनी विचारले, “वैष्णवीच्या अंगावर इतक्या जखमा कशा?” यावर राजेंद्र आणि शशांक म्हणाले, “आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे पाहिजेत. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं? म्हणूनच तिला मारलं.” असं जावायानं म्हटलं होतं. सारच्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती, असंही त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.