एजन्सी, पुणे. Swargate Rape Case:  स्वारगेट येथील राज्य परिवहन बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव 

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमध्ये बलात्कार (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हिस्ट्रीशीटर आरोपीनं बलात्कार केला. मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर 

पुणे पोलिसांनी आरोपीला पकडण्यात मदत करण्याचे जनतेला आवाहन केलं आहे. तसंच, या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असं पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंं.

गाडेबद्दल माहिती 020-24442769 किंवा 9881670659 या क्रमांकावर देता येईल. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

    आरोपी होता जामीनावर बाहेर

    आरोपीविरुद्ध पुणे आणि लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी, दरोडा आणि चेन स्नॅचिंगचे अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत. गाडे हा 2019 पासून एका गुन्ह्यात जामिनावर बाहेर होता. 2024 मध्ये गाडे याच्याविरुद्ध पुण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते.

    त्या पहाटे नेमकं काय घडलं…

    मंगळवारी पहाटे तरुणी फलटणला गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्टँडवर होती. यावेळी तिथे आरोपीनं दीदी म्हणत तिची विचारपूस केली. नंतर फलटणची बस इथं नाही तिकडे लागली आहे असं म्हणतं तरुणीची दिशाभूल केली आणि एका खाली शिवशाही बसमध्ये तिला घेऊन गेला. बंद बसमध्ये तिच्यावर बलात्कार केला अन् आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. यानंतर तरुणीनं याप्रकारची माहिती पोलिसांना दिली.

    आठ पोलिस पथके आरोपाचा शोध घेत आहेत तसंच पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षिसही जाहीर केलं आहे.

    बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक

    "पुण्यातील Swargate बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक,  सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे . या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही यासाठी शासन सर्व प्रयत्न करेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.