जेएनएन, मुंबई.Marathi Language Day 2025:राज्यभरात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. मुंबईत विविध संस्थांनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेटवे ऑफ इंडिया व इतर ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभर विशेष कार्यक्रम, पुरस्कार वितरण, व्याख्यान आणि सत्कार यांचा धडाका पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकार, मुंबई महापालिका आणि विविध संस्थाकडून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी योगदान देत आहे.
महाराष्ट्र सरकारकडून यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरण आज सायंकाळी प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या माध्यमातून आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अ. का. प्रियोळकर पुरस्कार डॉ. दत्ता भगत यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रामदास भटकळ या ‘मराठी भाषा- स्वरूप आणि वाटचाल’ या विषयावर संवाद होणार आहे. कालिना येथील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा व साहित्य भवन येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे. गिरणगाव प्ले स्टेशनच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने ‘झाडांच्या मनात जाऊ’ हा कार्यक्रम परळ येथील बृहन्मुंबई महापालिका पुस्तक उद्यान येथे कार्यक्रम होणार आहे.
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या माध्यमातून मुख्य टपाल कार्यालयात खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत.विशेष कॅन्सलेशन आणि विशेष पोस्टकार्ड प्रकाशित केले जाणार आहे. प्रख्यात सुलेखनकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अच्युत पालव आणि प्रख्यात लेखक गणेश मतकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.