जेएनएन, मुंबई: भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जादेखील मिळाला आहे. यावरूनच हे सिद्ध होते की, मराठी भाषा ही प्राचीन आणि समृद्ध अशी भाषा आहे. जगभरात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषेचे महत्त्व विषद करणारे अनेक कार्यक्रम या दिवशी जगभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मराठीतील सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या लेखणीच्या व साहित्याच्या माध्यमातून मराठीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनासोबतच मराठी राजभाषा दिवसदेखील साजरा केला जातो. बऱ्याचदा या दोन्हीमधील फरक समजून घेण्यात अनेकांची चूक होते. आजच्या या लेखातून आपण हा गैरसमज दूर करून यातील फरक जाणून घेऊया.

मराठी भाषा गौरव दिन
गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषा अस्तित्वात आहे आणि या भाषेला साहित्यिकांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यातलेच एक साहित्यिक, कवी म्हणजे कवी कुसुमाग्रज. त्यांनी मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाला व मराठी भाषेतील त्यांच्या प्रकाशित साहित्याला उजाळा देणे तसेच त्यांच्या कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीला मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला जातो. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला.

हेही वाचा:Marathi Language Day 2025: जाणून घ्या मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास, महत्त्व आणि इतर सर्व माहिती

महत्त्व:
हा दिवस विशेष करून साहित्यिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी, मराठी साहित्य आणि संस्कृतीशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मराठी राजभाषा दिवस
मराठी भाषा गौरव दिनाबरोबरच राज्यात 1 मे रोजी मराठी राजभाषा दिवसदेखील साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 1965 पासून करण्यात आली. महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने "1 मे" हा दिवस मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंतराव नाईक यांच्या सरकारने घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 11 जानेवारी 1965 रोजी 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' प्रसिद्ध केला व सन 1966 पासून हा अधिनियम अंमलात आला.

महत्त्व:
हा दिवस शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचा आहे. या दिवशी, मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय उपक्रम राबवले जातात.

हेही वाचा:Marathi Language Day 2025: मराठी भाषा दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या, या संदेशासह शुभेच्छा