जेएनएन, पुणे: कोरेगाव भीमा शौर्यदिनी देशभरातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन आणि वनविभाग सतर्क झाले आहेत. कोरेगाव भीमा आणि परिसरात बिबट्यांचा संचार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शौर्यस्तंभ परिसरात वनविभागाची विशेष पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
25 बिबटे पकडण्यात वनविभागाला यश
गेल्या काही दिवसांत कोरेगाव भीमा परिसरातून तब्बल 25 बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र परिसरात अधूनमधून बिबट्यांचा वावर दिसून येत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शौर्यदिनाच्या कालावधीत अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येत आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी त्वरित प्रतिसाद देणारी पथके सज्ज
शौर्यस्तंभ परिसर, पार्किंग क्षेत्र, दर्शनासाठी येणारे मार्ग, तसेच नदीकाठचा परिसर या ठिकाणी वनविभागाची गस्त वाढवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी सर्चलाईट्स, ड्रोनद्वारे निरीक्षण, पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीसाठी त्वरित प्रतिसाद देणारी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
जिल्हा प्रशासनाने भाविकांना आणि अनुयायांना अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अंधारात एकटे फिरू नये, जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे आणि कोणताही संशयास्पद प्राणी दिसल्यास तात्काळ पोलिस किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापनासोबतच आता वन्यजीव सुरक्षेवरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे शौर्यदिन शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
