जेएनएन, पुणे: मागील काही दिवसांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे कोयना धरण्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 9 फुटांवरून 11 फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. यातून सुमारो 78,400 क्युसेक विसर्ग व पायथा विद्युतगृहातून 2100 असा एकूण 80,500 क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

80,500 क्युसेकचा विसर्ग सुरू 

गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम घाट क्षेत्रासह कोयना पाणलोटात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यातच काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरणात पाण्याची वेगाने मोठी आवक होत आहे. यामुळे आज सकाळी कोयनेचे सहा वक्री दरवाजे 11 फुटांनी उघडून कोयना नदीपात्रात 78,400 क्युसेक तर, पायथा वीजगृहातून 2100 असा एकूण 80,500 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

नद्यांकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा

तसंच, याशिवाय सातारा जिल्ह्यातील धोम धरणातून 8659 क्युसेक, ‘कण्हेर’मधून 6485 क्युसेक, ‘उरमोडी’तून 3305 क्युसेक, ‘तारळी’तून 2804 क्युसेक असा जलविसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा- कोयनेसह त्यांच्या उपनद्यांनाही पूर आला आहे. या नद्यांकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.

धरणाचे सहा वक्र दरवाजे 11 फुटांपर्यंत उघडले

    सोमवारी रात्री कोयना पाणलोटात तुफानी पाऊस झाल्यानंतर आज मंगळवारी दुपारी 2 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे नऊ फुटांवरून अकरा फुटांपर्यंत उघडण्यात आले. आणि कोयनेतून कालच्या तुलनेत थेट दुप्पटहून अधिक असा 78,400 क्युसेकचा जलविसर्ग सुरु झाला. तर, पायथा विद्युत गृहातून 2100 क्यूसेक असा एकूण 80 हजार 500 क्युसेकचा एकूण विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

    अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद

    या प्रचंड जलविसर्गामुळे कोयना नदीला पुढे कृष्णा नदीलाही पूर आला आहे. अशातच पाटण तालुक्यातील नवजा ते कोयनानगर दरम्यान, पाबळ नाला येथे रस्ता खचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.