जेएनएन, मुंबई. नाशिक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये आज भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पवारांचा राज्यासह केंद्र सरकारवर हल्लाबोल

शरद पवार यांनी देवाभाऊ म्हणत झालेल्या निनावी जाहिरातींचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून प्रहार केला. नाशिकमध्ये आक्रोश मोर्चाला संबोधित करताना शरद पवार यांनी कृषी धोरणांवरून राज्यासह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. चुकीच्या धोरणांनी आत्महत्या होत असल्याचे ते म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले…

शेतकऱ्यांचा संसार अडचणीत आला आहे. देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात पोस्टर लावले. तुम्ही शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याच दाखवलं. देवाभाऊ शिवाजी महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली आणि सोन्याचा नांगर शेतकऱ्यांना घेता आला ते शेती करू शकले. आज शिवाजी महाराज यांचं नाव घेत आहात आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही. आपल्याला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. आगामी ठराविक दिवसांत तुम्ही मदत केली नाही तर नाशिकचा हा मोर्चास भविष्यात आणखी उग्र रूप घेईल. देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे. नेपाळमधे सरकार गेलं आणि भगिनीच्या हातात राज्य आलं आहे आणखी काही मी बोलणार नाही.