डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. महाराष्ट्राचे माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 1995 च्या फसवणुकीच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे, ज्यामुळे त्यांची आमदारकीची अपात्रता रोखली गेली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती
मुंबई हायकोर्टाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाचा सुट्टीचा कालावधी असताना व्हेकेशन बेंचसमोर त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली. यावर सुनावणी होईपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय दिला आहे. त्याशिवाय आमदार म्हणूनही अपात्र ठरवता येणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केले.
माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार
मुकूल रोहतगी हे कोकाटे यांच्याकडून बाजू मांडत होते. या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे. सुनावणी होईपर्यंत या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्याशिवाय आमदार म्हणून अपात्र ठरवता येणार नाही असंही कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे विधानसभेच्या आमदारकीवरील टांगती तलवार हटली आहे.
माणिकराव कोकाटे यांचे काय आहे प्रकरण?
शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवत कोकाटे बंधूंविरोधात अटकेचे वॉरंट जारी केले आहे. त्याविरोधात ते कायदेशीर लढाई लढत आहेत.
