जेएनएन, मुंबई: नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून राज्याच्या राजकारणात महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून या निवडणुकांत मोठं यश मिळवलं आहे.
दुपारी साडेचार वाजेपर्यंतच्या निकालांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने तब्बल 129 जागांवर विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 51 जागांवर यश मिळवलं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 33 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महायुती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक बळकट झाली आहे.
विरोधकांना मर्यादित यश
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही 8 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 35 जागांवर विजय मिळाला असला तरी अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. तसेच 24 जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
निकालावर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
या निकालानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्षाने या निकालांना जनतेचा कौल मान्य करत पुढील काळात संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं संकेत दिले आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील समीकरणांचा परिणाम झाल्याचंही पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
जामखेड नगरपरिषदेत भाजपाचा धक्कादायक विजय
दरम्यान, शरद पवार गटाचा दबदबा असलेल्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. कर्जत–जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे गटाच्या प्रांजल चिंतामणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या संध्या राळेभात यांचा पराभव केला. संध्या राळेभात या आमदार रोहित पवार गटाच्या उमेदवार होत्या.
रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
या पराभवानंतर आमदार रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देत हा निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याचं मान्य केलं आहे. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत, “हा पराभव आम्हाला आत्मपरीक्षणाची संधी देणारा आहे. पुढील निवडणुकांसाठी अधिक ताकदीने काम करू,” असं सूचक वक्तव्य केलं आहे.
