एजन्सी, मुंबई: जळगाव येथील एका कार्यक्रमादरम्यान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री बाबासाहेब पाटील यांचे वादग्रस्त विधान

"लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीला आश्वासन देतो. कुठे काय मागायचं हे लोकांनी ठरवायला पाहिजे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाई सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितलं की, आमच्या गावाला जो निधी आणून देणार त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागावं ते ठरवावं ना. अनिल भाईंनी आजची वेळ घालवण्यासाठी देऊन टाकू म्हटलं. मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागवायचं ते ठरवावं. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचं म्हणून आम्हीदेखील आश्वासन देतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे", असं बाबासाहेब पाटील म्हणाले.

मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया

"मी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बोलतोय. काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेलो असताना, आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं. अर्बन बँक आणि पतसंस्थेनेदेखील शेतकऱ्यांना कर्ज द्यावे. या योजना फक्त कर्जमाफीत बसत नाही. एवढाच माझा उद्देश होता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो", अशा शब्दांत बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

    पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, कर्जमाफीच्या मुद्द्यावर कोणीही बेताल भाष्य करू नये.

    "महायुती आघाडीच्या जाहीरनाम्यात पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख होता. ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे कारण बरेच लोक वर्षानुवर्षे शेती करत आहेत परंतु त्यांचे संपूर्ण कर्ज फेडू शकले नाहीत,” असे ते म्हणाले. राज्यभरात सर्वेक्षण सुरू आहे, असे बावनकुळे म्हणाले आणि ते पूर्ण झाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. कर्जमाफी हा महायुती सरकारच्या अजेंड्याचा एक भाग आहे, असे ते म्हणाले.

    सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे मराठवाडा आणि लगतच्या प्रदेशांवर मोठा परिणाम झाला आणि राज्यभरात 68. 69 लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली.

    राज्य सरकारने मंगळवारी पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज जाहीर केले.

    विशेष म्हणजे, पिकांचे नुकसान लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.