जेएनएन, नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाच्या वतीने 'रंग दे नागपूर' या भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेचे (wall painting competition) आयोजन येत्या 11 व 12 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून स्पर्धेसाठी भिंतींना स्वच्छ केला जात आहे. मनपातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चित्रकारांच्या 82 हून अधिक चमूने स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या देखरेखीत 'रंग दे नागपूर' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून मनपाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्याचे दर्शन घडविणे हा उद्देश आहे. विद्यार्थी (18 वर्षांवरील) आणि व्यावसायिक अशा दोन गटात ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यात विद्यार्थी गटामध्ये बीएफए, एम एफ ए. एटीडी, जीडी फाईन आर्ट विद्यार्थी यांचा समावेश असू शकतो, तर व्यावसायिक गटात हौशी चित्रकार आणि फाईन आर्टचे पदवीधर (उत्तीर्ण विद्यार्थी) यांचा समावेश असणार आहे.
याठिकाणी चित्र साकारण्यात येणार
रंग दे नागपूर स्पर्धेसाठी 1) 'नागपूर ॲट 75': अनेक दशकांतील वाढीचा आणि परिवर्तनाचा प्रवास, 2) 'स्वच्छ, हरित आणि स्मार्ट नागपूर': स्वच्छता, हिरवळ आणि स्मार्ट सिटी विकास, 3) नागपूरची संस्कृती, इतिहास आणि वारसा आणि 4) 'नागपूर- द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया' या चार संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार चित्रकाराला आपल्या कल्पकतेने चित्र साकारणार आहेत. याकरिता वसंत नगर ते नीरी कॉलनी गेट पर्यंत, रातूम नागपूर विद्यापीठ भिंत आणि मॉरेस कॉलेज टी-पाँइंट ते मानस चौक, लोहापूल याठिकाणी चित्र साकारण्यात येणार आहेत.
विजेत्यांना लाखोंची बक्षिसे
स्पर्धेतील विद्यार्थी गटातील विजेत्यांना १ लाख रुपयांचे पहिले बक्षीस, 75 हजार रुपयांचे दुसरे बक्षीस आणि 50 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस दिले जाणार आहे. तर व्यावसायिक गटातील विजेत्यांना 1 लाख 25 हजारांचे पहिले बक्षीस 1 लाख रुपयांचे दुसरे बक्षीस आणि 75 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस दिले जाणार आहे.
हेही वाचा:'स्वच्छ दिवाळी,शुभ दिवाळी' मनपाचे विशेष अभियान, दिवाळीतील निरुपयोगी साहित्य मनपाच्या केंद्रात जमा करा