जेएनएन, नागपूर: दिवाळीपूर्वी घरोघरी होणाऱ्या स्वच्छतेनंतर निघणारा अनुपयोगी वस्तूंचा कचऱ्याचा निपटारा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान येत्या 12 ऑक्टोबरपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर शहर स्वच्छ राखण्यासाठी या अभिनव उपक्रमाअंतर्गत शहरातील १०२ ठिकाणी दिवाळीतील अनुपयोगी वस्तू संकलन केंद्रांमध्ये संकलनाची व्यवस्था केली जाणार आहे.

 दिवाळीनिमित्त घरोघरी स्वच्छता केली जाते. आपले शहर हे देखील आपले घरच आहे. स्वच्छते दरम्यान घरातून निघणाऱ्या वस्तूंचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियानंतर्गत घेतला आहे. घरातून निघणाऱ्या वापरात नसणाऱ्या वस्तूंचा स्वीकार करण्यासाठी मनपाने दहाही झोन कार्यालय, झोन निहाय 102 कचरा संकलन/स्वीकार केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांसाठी येत्या 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ही विशेष सोय करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर वर्गीकृत स्वरूपातील कचरा आणून द्यावा व आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक साकरण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ 
‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियानाबद्दल श्रीमती वसुमना पंत यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या 'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' या मोहिमे अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत येत्या 12 ऑक्टोबरपासून शहरातील 10 झोनमध्ये कार्यालय आणि आरआरआर केंद्र या ठिकाणी दिवाळीतील निरुपयोगी वस्तू दान केंद्र सुरू होणार आहेत. तसेच 14 ऑक्टोबरपासून मनपाच्या हजेरीचे ठिकाण, विविध शाळा व समाज भवन येथे सुरू होणार आहे. तर 16 ऑक्टोबरपासून शहरातील 40 निवडक ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येतील. तरी नागरिकांनी आपल्या घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य जसे कपडे, लाकडी वा प्लास्टिकच्या वस्तू, घरातील भांडी, खुर्च्या, खेळणी, कपाट, चपला /जोडे, पुस्तकांची रद्दी, या संकलन केंद्रामध्ये जमा करून गरजुवंताना लाभ देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

 ई-वेस्ट साठी विशेष सोय
नागरिकांनी कपडे, वर्तमानपत्रांची रद्दी, पुस्तके, प्लास्टिकच्या वस्तू किंवा मुलांची खेळणी व इतर वस्तूंच्या संकलनासाठी कचरा दान केंद्रांमध्ये चार रंगाच्या कुंड्यांमध्ये अनुपयोगो वस्तू संकलित केला जाणार आहे.  यात लाल, पिवळ्या, हिरव्या व निळ्या रंगाच्या कुंड्या राहणार आहे. तसेच नागरिकांसाठी इलेक्ट्रनिक किंवा इलेक्ट्रिकल वस्तू संकलन करण्यासाठी विशेष सोय असणार आहे.लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल अधिक जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून यशस्वीपणे राबविला जात आहे. पर्यावरणपूरक दिवाळी सण साजरा करण्यासाठी नागपूरकरांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

मोठ्या वस्तूंसाठी घरपोच वाहन व्यवस्था
दिवाळीच्या स्वच्छते मध्ये निघणाऱ्या निरुपयोगी वस्तू उदा. अलमारी, पलंग, फर्निचर, सोफा सेट आदी तत्सम वस्तूसाठी केंद्रावर आणण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार मनपाद्वारे विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा: मनपाच्या 'स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत' सहभागी होऊन जिंका, 1 कोटी 63 लाखांचे बक्षीस, जाणून घ्या स्पर्धेबद्दल